मतमोजणीला सुरुवात होताच प्राथमिक कलांमधून भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरणार असल्याचं दिसत आहे. मात्र गेल्या निवडणुकीच्या तुलनेत भाजपाच्या जागा कमी होण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या जागांमध्ये वाढ होताना दिसत असल्यानं राज्यात कर्नाटक पॅटर्न राबवलं जाण्याचे संकेत काँग्रेसकडून देण्यात आले आहेत. कर्नाटकमध्ये भाजपाला सर्वाधिक जागा मिळूनही काँग्रेसनं जनता दल सेक्युलरला मुख्यमंत्रीपद देत भाजपाला सत्तेपासून दूर ठेवलं होतं.
तसाच काहीसा प्रयोग महाराष्ट्रात होणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
भाजपा सध्या 108 जागांवर आघाडी आहे. गेल्या निवडणुकीत भाजपानं 122 जागा जिंकल्या होत्या. एका बाजूला भाजपाच्या जागा कमी होताना दिसत असताना शिवसेनेच्या जागा मात्र वाढताना दिसत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांच्या एका ट्विटनं उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवणे ही काँग्रेस पक्षाची प्राथमिकता असेल, असं सावंत यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
भाजपाला सत्तेत जाण्यापासून रोखण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी शिवसेनेला पाठिंबा देणार का, असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे. सध्याची आकडेवारी पाहता शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडे 160 च्या आसपास जागा आहेत. त्यामुळे हे तीन पक्ष एकत्र आल्यास सत्ता स्थापन केली जाऊ शकते. मात्र काँग्रेस श्रेष्ठी तसा निर्णय घेणार का आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काँग्रेस, राष्ट्रवादीचा पाठिंबा घेणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Comments
Post a Comment
Your comments are important for us!